आज फैसला! खासदार समर्थक नगरसेवकांची रात्री बैठक

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेत सेनेसोबत सत्तेत रहायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी भाजपाच्या खासदार गांधी समर्थक नगरसेवकांची बैठक सायंकाळी पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

समिती सदस्य नियुक्त करताना सत्ताधारी सेनेने पत्र विचारात न घेतल्याने खासदार दिलीप गांधी समर्थक नगरसेवक संतप्त झाले आहे. महापालिकेत बुधवारी स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्य नियुक्तीची सभा झाली. भाजपचे खासदार पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी महासभेत पीठासीन अधिकारी तथा महापौर सुरेखा कदम यांना बंद लिफाफा दिला. आगरकर समर्थक दत्ता कावरे यांनीही सदस्यांची नावे दिली. महापौर कदम यांनी सुवेंद्र गांधी यांचे पत्र बाजुला ठेवत कावरे यांनी सुचविलेल्या नावांची घोषणा केली. त्यामुळे गांधी समर्थक चिडले आहेत. पत्र डावलले तर सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा गांधी समर्थक नगरसेवकांनी अगोदरच दिला होता. त्यानुसार निर्णय घेण्यासाठी आज पक्षाच्या नगरसेवकांची बैठक होत असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी ‘नगर टाइम्स’शी बोलताना सांगितले. 

बारस्करऐवजी वाकळे कसे?
सेनेच्या कोट्यातून भाजपचा एक सदस्य स्थायी समितीमध्ये पाठविला जाणार होता. तसे अगोदरच सेना-भाजपात ठरले होते. त्यानुसार सुवेंद्र गांधी यांनी सेनेच्या कोट्यातून मनिषा बारस्कर-काळे यांना स्थायी समितीत पाठविण्यात यावे असे पत्र सेनेला दिले. मात्र सेनेने गांधी यांचे हे पत्रही डावलले. बारस्कर यांच्याऐवजी सेनेने भाजपचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती बाबासाहेब वाकळे यांची नियुक्ती केली. बारस्कर यांच्याऐवजी वाकळे कसे? असा सवाल भाजपचे गांधी समर्थक विचारत आहेत. सेनेने परस्पर नाव बदलून भाजपात ‘लावालावी’ सुरू केल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप आहे.

राठोड की जाधव
स्थायी समिती सदस्य नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता ‘कोन बनेगा सभापती’ याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे. रपाठींबा देतेवेळीच सभापती पदाचा शब्द दिल्याचा दावा करत मनसेने सभापती मिळणार असे अगोदरच जाहीर केले आहे. त्यानुसार मनसेच्या एकमेव नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव या सभापती पदाच्या दावेदार मानल्या जात असतानाच सेनेने अनिता राठोड यांनी स्थायी समितीत पाठवून जाधव यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. जाधव यांना शह देण्यासाठीच सेनेची ही ‘खेळी’ असल्याचे बोलले जाते. सेना मनसेला दिलेला शब्द पाळते की सभापती पद स्वत:कडे ठेवत अनिता राठोड यांना संधी देते याची उत्सुकता लागून आहे. काँग्रेस सदस्याची जागा रिक्त ठेवून संख्याबळात युती वरचढ करण्याची सेनेची ‘चाल’ म्हणजे जाधव यांच्यासाठी ‘रेड सिग्नल’ मानला जातो.

सेनेची दुहेरी कसरत!
समिती सदस्यत्वाची संधी न मिळाल्याने सेनेने नगरसेवक डॉ. सागर बोरुडे व दीपाली नितीन बारस्कर नाराज झाले आहेत. बोरुडे यांनी उघडपणे सभागृहात भाजपच्या गांधी गटाची साथ केली. दीपाली बारस्कर यांनी तर थेट नगरसेवक पदाचाच राजीनामा दिला. पक्षाच्या नेतृत्वाच्या कारभारावर नाराज होत राजीनामा दिल्याचे बारस्कर यांचे म्हणणे आहे. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासोबतच मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही सोबत घेण्याची दुहेरी कसरत सेना नेत्यांना करावी लागणार आहे.

सेनेकडून पक्ष फुटीचे राजकारण
सेनेने भाजपच्या दोन नगरसेवकांना (दत्ता कावरे, उषा नलावडे हाताशी धरून पक्षात फाटाफुट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुवेंद्र गांधी व उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केला आहे. मात्र सेनेने भाजपचा हा आरोप फेटाळून लावला आहे. गटनेते पदाचा वाद हा त्यांच्या पक्षांतर्गत आहे. विभागीय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या गटनेत्यांची पत्रे स्वीकारल्याचे स्पष्टीकरण सेनेकडून दिले जात आहे.

LEAVE A REPLY

*