अशुभ मंगल…सावधान!

0

मंगल कार्यालये बेकायदा

करबुडविण्यासाठी ‘सांस्कृतिक’ परवानगी , महापालिका प्रशासनाचे ‘सोवळे’ उतरेना

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्वच मंगल कार्यालये बेकायदा आहेत. सांस्कृतिक केंद्राचा परवाना घेत त्यांनी ही मंगल कार्यालये थाटली आहेत. कर बुडविण्यासाठीच त्यांचे हे अमंगल काम सुरू आहे. परिणामी महापालिकेच्या लाखो रूपयांच्या महसुलाला चुना लागत आहे. अर्थातच बहुतांशी मंगल कार्यालये ही राजकीय नेत्यांची आणि त्यांच्या पंटरांची आहेत. यामुळेच प्रशासन कारवाई करण्यास सोवळ्यातून बाहेर येत नाही.

मंगल कार्यालयांना परवानगी दिल्याची कोणतीच नोंद महापालिकेच्या दप्तरी नाही. एकीकडे महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावल्याची ओरड करणारे पदाधिकारी मंगल कार्यालयाच्या प्रश्‍नावर मात्र मूग गिळून बसले आहेत. विशेष म्हणजे शहरातील बहुतांश मंगल कार्यालये ही राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रशासनही त्यावर कारवाई करण्याचे धाडस करीत नाही.
नगर शहरातील हॉस्पिटलची बेकायदा बांधकामे महापालिकेच्या रडावर आल्यानंतर मंगल कार्यालयाचा विषयही चर्चेत आला होता. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी हा प्रश्‍न हाती घेतला होता. अतिक्रमण विभागाला त्यांनी शहरातील मंगल कार्यालयाचा प्राथमिक सर्व्हे करण्याचा आदेश दिला. अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने शहरातील मंगल कार्यालयांचा सर्व्हे केला असता 38 मंगल कार्यालये असल्याचे स्पष्ट झाले. मात्र एकाही मंगल कार्यालयास महापालिकेने परवानगी दिलेली नाही. सांस्कृतिक केंद्राची परवानगी घेत तेथे प्रत्यक्षात मंगल कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
घरगुती, व्यावसायिक अशा दोन प्रकारच्या मालमत्ता कराची महापालिका आकरणी करते. मंगल कार्यालये व्यावसायिक करात मोडत असल्याने लाखो रुपयांच्या करावर महापालिकेला पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
शहरात मंगल कार्यालये आहेत. मात्र त्यांना परवानगी नाही. सांस्कृतिक केंद्राची परवानगी अनेकांनी घेतलेली आहे. मंगल कार्यालय व सांस्कृतिक केंद्र याचे निकष वेगवेगळे आहेत. मंगल कार्यालयांनी परवानगी घेतली आहे का? घेतली असेल तर काय म्हणून घेतली आहे? आणि परवानगी घेताना दिलेल्या प्लॅननुसार बांधकाम आहे का? याची प्राथमिक तपासणी केली तर अनेकांचे पितळ उघडे पडेल. मात्र ही तपासणी करण्याकरीता महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडे पुरेसे मनुष्यबळच नाही.

सांस्कृतिकची पळवाट, तरीही बेकायदाच
सांस्कृतिक केंद्राची परवानगी घेतली असली तरी परवानगी घेताना महापालिकेकडे दिलेला प्लॅन व प्रत्यक्षातील बांधकाम यात मोठी तफावत आहे. त्यामुळे सांस्कृतिक केंद्राची परवानगी असली तरीही त्याचे बांधकामही बेकायदा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पार्किंगच्या जागेवरही कमाई
मंगल कार्यालयात लग्नासाठी येणार्‍या वर्‍हाडींचे वाहने लावण्यासाठी करण्यासाठी पार्किंग असणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील एकाही मंगल कार्यालयाकडे पार्किंगची सोय नाही. पार्किंगच्या जागेवर लॉन करून ती जागा गडप करण्यात आली आहे. त्या जागेचेही भाडे संबंधितांकडून आकारले जात आहे. पार्किंग नसल्याने वाहने आपोआप रस्त्यावर येतात. परिणामी ट्रॅफिक जॅम होतो.

महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाला मंगल कार्यालयाचा सर्व्हे करण्याकरीता इतर विभागातील कर्मचारी मदतीसाठी दिले होते. काही दिवसानंतर ते पुन्हा काढून घेण्यात आले. त्यामुळे प्राथमिक सर्व्हे झाल्यानंतर प्रत्यक्षात मोजमाप घेऊन नोटीसा बजावणीचे काम अपूर्णच राहिले.

LEAVE A REPLY

*