अन्याय झाल्यास आपण कुरण ग्रामस्थांबरोबर

0

ना. राधाकृष्ण विखे पाटील ः ग्रामस्थांशी साधला संवाद

 

संगमनेर (प्रतिनिधी) – कुरण येथे निर्माण झालेली परिस्थिती सामंजस्य आणि संवादानेच पूर्वपदावर येऊ शकते. घडलेल्या घटनेचा चौकशी अहवाल उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडून समोर आल्यानंतरच घटनेतील खरी सत्यता स्पष्ट होईल, पण ठराविक गुन्हेगारांसाठी संपूर्ण गावाला वेठीस न धरता या घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, गावकर्‍यांवर अन्याय झाल्यास मी स्वत: पोलीस प्रशासनाच्या विरोधात आणि राज्य सरकारकडे न्याय मागण्यासाठी तुमच्याबरोबर असेल अशी ग्वाही विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुरण ग्रामस्थांना दिली.

 
कुरण येथे 19 मे रोजी घडलेल्या घटनेनंतर गावात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांनी कुरण येथे येऊन, ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, पोलीस उपाधीक्षक अजय देवरे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार रावसाहेब सोनवणे, भास्करराव दिघे, सुदामराव सानप, शरद थोरात, डॉ. सोमनाथ कानवडे, शंकर पा. वाळे, शौकत जहागिरदार, अजिज शेख, शरीफ शेख, नानासाहेब दिघे आदींसह ग्रामस्थ याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यावतीने विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील यांना घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमिवर निवेदन देण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक ओमासे यांना निलंबीत करावे, कुरण घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी, ग्रामस्थांना धमकावल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक ओमासे यांना निलंबीत करून गुन्हा दाखल करावा आणि विनाकारण ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
गावातील वातावरण हे सामंजस्याने आणि संवादाने पूर्वपदावर येईल. या घटनेत पोलिसांना झालेल्या मारहाणीचे कोणीही समर्थन करणार नाही, पण या घटनेत दोषी असलेल्यांवर जरूर कारवाई करावी.

 

पण, संपूर्ण गावाला वेठीस धरू नका अशा सूचना पोलीस अधिकार्‍यांना करतानाच ना. विखे पाटील यांनी या घटनेच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे या घटनेची चौकशी पोलिस उपधीक्षक करीत आहेत. त्यांच्या चौकशी अहवालातून घटनेची खरी सत्यता स्पष्ट होईलच.

 

 

यामध्ये पोलीस अधिकारी दोषी असतील तर, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण सरकारकडे करू आणि ग्रामस्थांवर अन्याय होणार असेल तर, आपण स्वत: तुमच्याबरोबर आंदोलनात पुढे राहू, अशी ग्वाही विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी दिली. कुरण घटनेच्या पार्श्वभूमीवर ना. विखे पाटील यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक शासकीय विश्रामगृहात घेतली.

 

 प्रारंभी कुरण ग्रामस्थांच्यावतीने सुदामराव सानप यांनी घडलेल्या घटनेचे सविस्तर विवेचन केले. स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस अधिकार्‍यांकडून झालेल्या त्रासाच्या तक्रारी विरोधी पक्षनेत्यांच्या पुढे विषद केल्या. पोलीस अधिकारी गावात येवून, विनाकारण अटक करत आहेत. पोलिसांच्या या दहशतीमुळे कुरणमधील ग्रामस्थ गावाबाहेर निघून गेले आहेत. याचा विपरीत परिणाम शेती व्यवसायावर होऊ लागला आहे. आदी बाबी कुरण ग्रामस्थांनी ना. विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या तक्रारींबाबत अधिकार्‍यांनाही त्यांनी विचारणा करून खुलासा करण्यास भाग पाडले. 

LEAVE A REPLY

*