अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी प्रसंगी भाजपाबरोबरही

0

नाशिक, ता.15, प्रतिनिधी
महापालिकेत क्रमांक तीनवर राहिलेल्या राष्ट्रवादी पक्षाने आता जिल्हा परिषदेची सत्ता हातातून जावू नये यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर सुरवातीला शिवसेनेशी वाटाघाटीबाबत त्यानंतर चर्चा निष्फळ झाल्यास प्रसंगी भाजपाबरोबर जावून सत्ता स्थापण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे.

बुधवारी सकाळी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अजित पवार यांनी नाशिक जिल्हयात जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी काही सदस्यांनी शिवसेनेला सोबत घेवून सत्ता स्थापन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

तर बहुतांशी सदस्यांनी शिवसेनेकडून वाटाघाटी निष्फळ होत असल्याने वरीष्ठ नेत्यांनी भाजपाशी बोलणी करून सत्ता स्थापन करावी अशी भूमिका मांडली. यावेळी जिल्हयातील ज्येष्ठ पदाधिकारयांनी शिवसेनेशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले. परंतु अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यास त्यांचा स्पष्ट नकार आहे.

याशिवाय शिवसेनेमध्ये अध्यक्षपदासाठी ईच्छुकांची भाउगर्दी झाल्याने अध्यक्षपदाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जावू नये यासाठी ते आग्रही आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करतांना अडचणी येत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी आग्रही असून पक्षाला अध्यक्षपद देण्यास जो पक्ष अनुकूल असेल त्या पक्षासोबत सत्ता स्थापन करावी अशी अपेक्षा काही सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाशिक महापालिकेत सत्ता स्थापनेचे मनसुबे उधळल्यानंतर आता जिल्हा परिषद हातातून जावू नये यासाठी शिवसेनेकडून मोटबांधणी करण्यात येत आहे. त्यामुळेच अध्यक्ष शिवसेनेचाच हवा ही भूमिका पक्षाची असल्याने त्यांनीही राष्ट्रवादीच्या अटींना जास्त महत्व दिले नाही.

त्यामुळे राष्ट्रवादीची अधिक कोंडी होत असून आता तर सत्ता स्थापनेसाठी ‘समविचारी’ नसलेल्या भाजपाला सोबत घेवून सत्ता स्थापण्याची तयारी वरीष्ठांनी दाखविली आहे. त्यानुसार जिल्हयातील पदाधिकारी व जिल्हा परिषदेत निवडुन आलेल्या सदस्यांनी थेट अजितदादांना गळ घातली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांशी अंतिम बोलणी केली जाणार आहे.

त्यांनी अध्यक्षपद नाकारले तर भाजपाबरोबर सत्ता स्थापण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जाणार आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीसाठी आमदार पंकज भुजबळ, जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नाना महाले, आमदार दिलीप बनकर, निवडुण आलेले सर्व सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*