अकोले बाजार समितीचे सभापती नाईकवाडींवर बिबट्याचा हल्ला

0
गर्दनी येथील घटना, नाशिक येथे उपचार सुरू

अकोले(प्रतिनिधी)-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परबतराव नाईकवाडी यांच्यावर मंगळवारी सकाळी बिबट्याने हल्ला केल्याची घटना गर्दनी (ता.अकोले)येथे घडली. नाईकवाडी व बिबट्या यांच्यात साधारण पाच ते सात मिनिटे झटापट सुरु होती.यात नाईकवाडी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नाशिक येथे उपचार सुरु आहेत.
नाईकवाडी हे नेहमी प्रमाणे सकाळी 6 वाजता आपले गर्दनी शिवारातील शेतात गेले होते. शेतात पाणी सुरु आहे की नाही हे पाहत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाठीमागील बाजूने त्यांच्या वर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात नाईकवाडी यांच्या डोक्याला पहिल्यांदा बिबट्याने चावा घेतला. या झटापटीत ते बांदावरून खाली कोसळले.समयसूचकता बाळगून त्यांनी उभे राहून बिबट्याला दूर लोटले.

यामुळे बिबट्या अधिकच चवताळला आणि त्याने त्यांच्यावर दुसर्‍यांदा हल्ला चढविला. यामध्ये नाईकवाडी यांचे तोंड, छाती, दोन्ही हात, पाठीला बिबट्याने चावा घेतला. दोघांमध्ये पाच ते सात मिनिटे ही झटापट सुरु होती.नाईकवाडी यांनी बिबट्याचा बचळा पकडला व सर्व शक्तिनिशी बचळा धरून बिबट्याला दूर लोटले. यामुळे बिबट्याने त्यांच्या बोटांचा चावा घेतला.

यानंतर बिबट्या नजीक असणार्‍या त्यांच्याच उसात शिरला.यानंतर त्यांनी त्यांच्या शेतात असणार्‍या गड्याला व चिरंजीव श्रीकांत नाईकवाडी यांना बोलावून घेतले.त्यांनी त्यांना रक्तभंबाळ अवस्थेत येथील डॉ. भांडकोळी यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान नाईकवाडी यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची वार्ता शहरात व तालुक्यात पसरताच बसस्थानक परिसरात असणार्‍या रुग्णालय परिसरात एकच गर्दी झाली.

पुढील उपचारार्थ त्यांना नाशिक येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हल्ल्यात त्यांना 15 ते 20 टाके पडले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.दरम्यान माजी मंत्री मधुकरराव पिचड,आ.बाळासाहेब थोरात,आ.डॉ.सुधीर तांबे,आ.अरुण जगताप,जिल्हा परिषद अध्यक्षा ना.शालिनीताई विखे पाटील यांनी भ्रमणध्वनीहुन नाईकवाडी यांच्या प्रकृतीची चौकशी केली तर आमदार वैभवराव पिचड ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नाईकवाडी हे बालंबाल बचावले आहेत.वनखात्याने गर्दनी गाव व शिवारात तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*