अकोलेच्या अर्शद पठाणला सुवर्णपदक

0

दक्षिण आशियाई ऑलिम्पिक बुध्दिबळ स्पर्धेत 

अकोले (प्रतिनिधी)- कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय स्टुडंट ऑलिम्पिक बुध्दिबळ स्पर्धेत भारतीय संघाचा खेळाडू अर्शद युनूस पठाण याने सुवर्णपदक पटकावून अटकेपार देशाचा झेंडा फडकावला. कुठल्याही माहितीविना केवळ मोबाईल इंटरनेटवर बुध्दिबळाचा सराव करून सुवर्ण पदकाची कामगिरी करणार्‍या अर्शदचे यश ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारे ठरेल. अर्शद हा अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाचा तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी आहे.
स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने दक्षिण आशियाई बुध्दिबळ, योगा, कबड्डी, व्हॉलिबॉल व कराटे स्पर्धा कोलंबो येथे झाल्या. या स्पर्धेत भारतातून 51 स्पर्धक आले होते. बुध्दिबळ क्रीडा प्रकारात भारतीय संघातील 5 खेळाडूंमध्ये अगस्ती महाविद्यालयाचा तृतीय वर्ष कला शाखेतील अर्शदचा समावेश होता. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूचा अर्शदने दारूण पराभव करून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
2018 मध्ये दिल्ली येथे होणार्‍या ऑलिम्पिकसाठी पठाण याची निवड झाली आहे. त्यास महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.राहुल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव प्रतिक भारद्वाज, कार्यकारी संचालक अनिल शर्मा, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शंकर गायकवाड, सचिव सुनील शिंदे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष उदयसिंह पाटील, सचिव सुमिती आढाव, प्राचार्य डॉ.संजय ताकटे यांनी कौतुक केले आहे.

बुध्दिबळ आदिवासी, ग्रामीण भागात पोहचविणार
मला लहानपणापासून बुध्दिबळाची आवड होती. मोबाईलच्या इंटरनेटवर ऑनलाईन सराव करून हा खेळ शिकलो. काही मित्रांनी पाठविलेल्या पुस्तकातून नियम माहीत झाले. बुध्दिबळ हा खेळ ग्रामीण, आदिवासी भागात वाढण्यासाठी इतरांना शिकविणार आहे. शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे.
-अर्शद पठाण, खेळाडू

LEAVE A REPLY

*